सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतीक्षित बदल्यांची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार होती. मात्र प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया आता १२ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. विशेषतः अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. गतवर्षी काटेकोरपणे राबविण्यात आलेल्या बदल्यांमुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला होता.
जंगम यांच्या बदलीनंतर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रशासन विभागाने नव्याने बदली कार्यक्रम आखला असला तरी अर्थ विभागातील कर्मचारी तसेच बदली व पदोन्नतीनंतर पुन्हा मुख्यालयात स्थायिक झालेल्यांना वगळण्यात येत असल्याची चर्चा आहे. १२ मेपासून समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन होते. मात्र पीसीआर समितीने निर्देशित केलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख सध्या मुंबईत असून प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील याही तेथे असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत परिचर व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असताना गेल्या दहा वर्षांपासून चालकांच्या बदल्या झालेल्या नसल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत चालकांचाही समावेश करावा, अशी मागणी पुढे येत आहे. काही कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींसंदर्भातील कारवाईच्या फायली दाबून ठेवल्याची चर्चा देखील सुरू असून, शिस्तभंगाच्या प्रकरणांवरील अहवाल अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासमोर बदली प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने राबविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.











