सोलापूर, : राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक व प्रशासकीय कामांच्या अतिरिक्त भारामुळे अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मंगेश चिवटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असून, त्यामुळे त्यांच्या मानसिक तणावातही वाढ होत आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेत अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त बोजा कमी करावा, अशी मागणी चिवटे यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षक हिताचे निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी शिंदे सरकारने शिक्षकांच्या टप्पावाढीचा निर्णय घेत शिक्षकांना दिलासा दिल्याची आठवणही यावेळी करून देण्यात आली. दरम्यान, मंगेश चिवटे यांच्याकडे सध्या पुणे विभागीय शिक्षक मतदार नोंदणी प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर केला.


‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना’च्या माध्यमातून शिक्षक संघटन अधिक बळकट करण्यासाठी चिवटे सध्या पाचही जिल्ह्यांतील तालुकास्तरावर दौरे करत आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी आपले परिचयपत्र उपमुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत राज्यातील शिक्षक व शिक्षण संस्था चालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधले. आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिवटे यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आरोग्य क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रातही त्यांनी सक्रियपणे कामकाज सुरू केल्याने विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे स्वागत होत आहे.











