सोलापूर : जिल्ह्यात मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत आणि विभागांमध्ये समन्वय वाढवावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले. आपत्तीच्या प्रसंगी “दामिनी” आणि “सचेत” या मोबाईल ॲपचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मान्सूनपूर्व तयारी २०२६ च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता श्रीमती अकुललवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व तहसीलदार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी परिवहन विभागाला जेसीबी, पॉकलेन यांसारख्या अर्थमूव्हिंग यंत्रसामग्रीची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच तहसीलदारांनी तालुकास्तरावर सर्व विभागांच्या बैठका घेऊन आपत्तीपूर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यास सांगितले.


- ग्रामसुरक्षा यंत्रणा ही प्रभावी आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था असून, आपत्तीपूर्व सूचना देण्यासाठी तिचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. महावितरण विभागाने २४ तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष सुरू करावा, तसेच वादळ व अतिवृष्टीमुळे वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले जनावरांच्या चाऱ्याबाबत तहसीलदारांनी नियमित आढावा घेऊन टंचाई टाळण्यासाठी नियोजन करावे. आवश्यकतेनुसार चाराबंदी आदेशासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक तहसीलदारांकडे आपत्ती काळातील समन्वयासाठी गोपनीय फोन उपलब्ध असावा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा, नालेसफाईची कामे पूर्ण करावीत तसेच तलाव व विहिरीतील पाण्याची स्वच्छता राखावी, अशा सूचनाही निऱ्हाळी यांनी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपत्ती काळात करावयाच्या कामकाजाची तसेच आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेची माहितीही त्यांनी सादर केली.









