गळ्यात आयडी, छातीवर बॅच; महापालिकेत शिस्त व ओळख सुलभ करण्याचा उपक्रम
सोलापूर : महापालिकेतील लोकप्रतिनिधींची ओळख अधिक स्पष्ट व नागरिकांशी संवाद सुलभ व्हावा यासाठी सोलापुरातील नगरसेवकांना आता नवी ओळख मिळाली आहे. नगरसेवकांसाठी अधिकृत ओळखपत्र (आयडी कार्ड) आणि छातीवर लावण्यासाठी विशेष बॅच देण्याचा उपक्रम महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

या उपक्रमामुळे महापालिका मुख्यालय, विविध विभागीय कार्यालये तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नगरसेवकांची ओळख सहज होणार आहे. अनेकदा नागरिकांना लोकप्रतिनिधी ओळखण्यात अडचणी येत असल्याने ही संकल्पना राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. गळ्यात आयडी कार्ड आणि छातीवर अधिकृत बॅच परिधान केल्याने नगरसेवकांचा अधिकृत सहभाग स्पष्ट होणार असून, सुरक्षा व्यवस्थेलाही मदत होणार आहे. महापालिका बैठका, पाहणी दौरे आणि विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये एकसमान ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, या नव्या उपक्रमाचे अनेक नगरसेवकांनी स्वागत केले असून, लोकप्रतिनिधींच्या कामकाजात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.












