चेतन नरोटे यांच्या नियुक्तीवर नाराजी; पदाधिकाऱ्यांचे सवाल, राजीनाम्यांमुळे पक्षात खळबळ
सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून पक्षात अंतर्गत असंतोष उफाळून आला असून चेतन नरोटे यांच्या पुनर्नियुक्तीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींनाच जाब विचारण्याची भूमिका घेतली असून राजीनाम्यांच्या सत्रामुळे शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसताना काँग्रेस भवनासमोर विरोधी पक्षांकडून विविध आंदोलने झाली होती. अशा परिस्थितीत पक्षाला नेमका कोणता राजकीय फायदा करून दिला म्हणून चेतन नरोटे यांच्यावर पुन्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, असा सवाल नाराज पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काही विशिष्ट व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याची चर्चा पक्षांतर्गत रंगू लागली आहे.
या वादात काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनीही उघड भूमिका घेत पक्षश्रेष्ठींना आपण जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद आता स्थानिक पातळीपलीकडे जाऊन प्रदेश नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, महाराष्ट्र प्रदेश व्हीजेएनटी विभाग सचिव, सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष, माजी नगरसेवक, परिवहन समितीचे माजी सभापती तसेच अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. चेतन नरोटे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत “निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

शहराध्यक्षपदासाठी तब्बल १८ जण इच्छुक होते. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन नावे प्रदेश पातळीवर पाठवण्यात आली होती. मात्र खासदार प्रणिती शिंदे या चेतन नरोटे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “एका व्यक्तीला किती पदे आणि किती संधी?” असा रोखठोक सवालही काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. शहराध्यक्ष निवडीवरून सुरू झालेल्या या नाराजीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका व्यक्तीला किती संधी?
कार्यकर्त्यांचा सवालकाँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी तब्बल १८ जण इच्छुक होते. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन सर्व नावे प्रदेश पातळीवर पाठवण्यात आली होती. मात्र खासदार प्रणिती शिंदे या चेतन नरोटे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खा. शिंदे यांची चेतन नरोटे यांच्यावर एवढी मर्जी का? असा सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. “एका व्यक्तीला किती पदे आणि किती संधी? असा रोखठोक प्रश्नही काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.












