राऊत, माने, परिचारक, पवार, सातपुते यांची नावे चर्चेत; मुंबईत भेटीगाठींना वेग
सोलापूर : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय वर्तुळात माजी आमदार राजेंद्र राऊत, दिलीप माने, प्रशांत परिचारक, राजन पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच माजी आमदार राम सातपुते यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. इच्छुकांकडून मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून समर्थकांनीही राजधानीत ठाण मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


माजी आमदार दिलीप माने यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेले जुने मैत्रीपूर्ण संबंध सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. २००९ ते २०१४ या काळात दोघेही विधानसभेत एकत्र कार्यरत होते. त्यामुळे माने यांच्या नावाला अधिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
- दुसरीकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांचे नावही चर्चेत आघाडीवर आहे. “एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार का?” अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध, तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत दिसणारी जवळीक यामुळे पवार यांच्या दाव्यालाही वजन प्राप्त होत असल्याचे मानले जात आहे. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, उत्तर सोलापूरमधील दिलीप माने गट आणि शहाजी पवार गटाचे कार्यकर्ते सध्या मुंबईतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इच्छुकांची संख्या वाढत असताना पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाला संधी देणार, की ऐनवेळी एखादा नवा चेहरा समोर येणार, याबाबत जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.











