सोलापूर : दिवसभर वाढलेल्या तापमानाने आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. रात्री ८ ते १० या वेळेत शहराच्या विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दिवसभर तापलेल्या रस्त्यांवर पावसाच्या सरी बरसताच मातीचा सुगंध दरवळला. अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडून या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस सोलापूर शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा वळवाचा नव्हे, मोसमी पाऊस
हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या निकषांनुसार १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणारा पाऊस हा मोसमी पाऊस मानला जातो. त्यामुळे सोलापुरात झालेला हा पाऊस वळवाचा नसून मोसमी पावसाची सुरुवात असल्याचे मानले जाते. या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्याची सुखद नांदी मिळाली असून जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ९६ टक्के पावसाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रात्रीच्या सरींनी उकाड्याचा पारा खाली आणत सोलापूरकरांना दिलासा दिला असून आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










