सोलापूर | अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत अर्जातील चुकीच्या माहितीमुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालयाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची आणखी एक संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना सोलापूरसह राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविण्यात आल्या आहेत. पहिल्या प्रवेश फेरीत अनेक विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना तांत्रिक तसेच मानवी चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. मूळ कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये तफावत आढळल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता.

यामुळे पात्र असूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेरीपूर्वी अर्जातील चुका दुरुस्त करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील प्रवेश प्रक्रियेत त्यांना संधी उपलब्ध होणार आहे.

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी
- अर्जातील चुकीची माहिती दुरुस्त करता येणार
- प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना लाभ
- पुढील फेरीपूर्वी सुधारणा करण्याची सुविधा
- शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा निर्णय










