सोलापूर, प्रतिनिधी : सोलापूर बार असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जूनअखेरीस जाहीर होणार असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा वकिलांमध्ये रंगू लागली आहे. जिल्हा न्यायालयात वकिली करणारे आणि बार असोसिएशनचे सदस्य असलेले सुमारे १६०० ते १८०० वकील यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे विधी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी वकील बांधवांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून, भेटीगाठी आणि संवादाच्या माध्यमातून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
ॲड. राजेंद्र फताटे यांनी यापूर्वीही बार असोसिएशनची निवडणूक लढविल्यामुळे त्यांचा अनुभव आणि संपर्क यांची चर्चा होत आहे. तर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा ॲड. संतोष पाटील यांना मिळू शकतो, अशीही वर्तुळात चर्चा आहे. मात्र, दोन्ही संभाव्य उमेदवारांकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ॲड. बाबासाहेब जाधव यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. यंदाची निवडणूकही तितकीच चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून २० जुलैपूर्वी नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
५ जुलैला कायदेविषयक चर्चासत्र निवडणुकीपूर्वी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसाठी कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
“सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी कायदेविषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत बार असोसिएशनची निवडणूक पार पडेल.” — ॲड. बाबासाहेब जाधव, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन