पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी वारीपूर्वी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, २३ व २४ जून या दोन दिवसांत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मूर्तीवरील झीज रोखण्यासाठी आणि संरक्षक उपाययोजना राबविण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संवर्धन मोहीम हाती घेतली जाणार आहे.
मंदिर समितीच्या माहितीनुसार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २२ ते २४ जूनदरम्यान आवश्यक तांत्रिक कामे केली जाणार आहेत. यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. बैठकीत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित तज्ज्ञांनी संवर्धनाच्या आराखड्यावर चर्चा केली. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर काळाच्या ओघात नैसर्गिक झीज होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मागील संवर्धनाला जवळपास पाच वर्षे पूर्ण झाल्याने मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे, झिजलेले भाग आणि पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये दुरुस्तीबरोबरच मूर्तीचे आयुष्य वाढविण्यासाठी संरक्षक आवरणही देण्यात येणार आहे.
यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या वर्षांतही मूर्तींचे संवर्धन करण्यात आले होते. यंदाचे कामही अत्यंत काळजीपूर्वक आणि धार्मिक परंपरांचा मान राखून केले जाणार असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. मंदिर दर्शनासाठी २३ व २४ जून रोजी प्रवेश बंद राहणार असल्याने वारकरी, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.