सोलापूर राजेश्वरी नगर, बाळे येथील एन के किड्स स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव आणि शाळेचा पहिला दिवस उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या निरागस हास्याने आणि पालकांच्या उत्साहाने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे तसेच शिक्षिका पूनम कळसाई, रोहिणी आदलिंगे आणि प्राजक्ता भस्मे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना फुले, फुगे आणि चॉकलेट देत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक कार्टून पात्रे आणि विविध चित्रांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे शाळेत प्रथमच येणाऱ्या चिमुकल्यांना आनंददायी आणि खेळकर वातावरणाचा अनुभव मिळाला.

काही चिमुकले आई-वडिलांपासून दूर होताना भावूक झाले, तर काही नवीन मित्रमैत्रिणींसोबत हसत-खेळत शाळेच्या वातावरणात रमून गेले. त्यांच्या निरागस भावभावनांनी उपस्थित पालकांचेही मन जिंकले. प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सेविका संगीता हेडगडकर आणि सुनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबतची आवड निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला.











