सोलापूर : राज्यातील अभियांत्रिकी, बीई, बी.टेक., एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज भरताना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर न केल्यास आरक्षित प्रवर्गातील प्रवेशाचा लाभ गमवावा लागू शकतो. प्रवेश प्रक्रियेनुसार अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, एनटी, ओबीसी, एसबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच, एससी व एसटी प्रवर्ग वगळता इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या नियमांनुसार पात्रता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
अनेक विद्यार्थी अर्ज भरताना मूळ प्रमाणपत्रांऐवजी केवळ अर्जाची किंवा पडताळणीची पोचपावती अपलोड करतात. अशा विद्यार्थ्यांना चौथ्या कॅप फेरीच्या अंतिम रिपोर्टिंगपूर्वी संबंधित महाविद्यालयात मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे जमा न केल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवरील प्रवेश रद्द होऊ शकतो. मात्र, विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास त्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये ओपन कोट्यातून संधी मिळू शकते.
ई-स्क्रुटिनी प्रक्रियेदरम्यान अर्जात काही त्रुटी आढळल्यास त्या निर्धारित कालावधीत दुरुस्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुदतीत दुरुस्ती न झाल्यास संबंधित उमेदवाराचे नाव गुणवत्ता यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज, कागदपत्रे आणि पडताळणीची प्रत्येक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रवेश प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे.
“अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कोणतीही घाई न करता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. विशेषतः आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता, नॉनक्रीमीलेअर व इतर आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक मुदतीचे पालन केल्यास विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांचा प्रवेश सुरक्षित होईल.” – सचिन जगताप, शिक्षण अधिकारीमाध्यमिक
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड : २ ते १२ जुलै
कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती : ३ ते १३ जुलै
अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी १,००० रुपये