सोलापूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) मोहिमेचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा गुरुवार (दि. ९ जुलै)पासून सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशाने माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांची बीएलओ (Booth Level Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व माहिती संकलनाचे काम पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करायचा आहे.या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित शैक्षणिक कामकाज अबाधित राहावे, यासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत अध्यापन व शैक्षणिक उपक्रम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर नियुक्त शिक्षकांनी दिवसभर एसआयआर मोहिमेचे काम युद्धपातळीवर पार पाडावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर कोणतीही कामे देऊ नयेत, असे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सकाळी अध्यापन आणि दुपारी बीएलओचे काम असा समन्वयाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.
दरम्यान, काही शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत कोणत्याही शिक्षकांनी आंदोलनात सहभागी न होता शासनाच्या निर्देशानुसार अध्यापन आणि एसआयआर मोहिमेचे काम वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निर्णयाबाबत मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने यांनी समाधान व्यक्त करत, सकाळच्या सत्रात शाळा भरवून दुपारच्या वेळेत बीएलओचे काम करण्याची सुविधा दिल्याने शैक्षणिक कामकाज आणि राष्ट्रीय मोहीम दोन्ही प्रभावीपणे राबविता येणार असल्याचे सांगितले.सोलापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे एसआयआर राष्ट्रीय मोहिमेतही जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केली.