सोलापूर : शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित १४७८ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सल्लागार तथा ‘मित्रा’चे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत प्रकल्पाचा अंतिम तांत्रिक आराखडा (टीपीआर), जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन तसेच पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर शासनाकडे सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. टीपीआर मंजूर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यात येणार आहे.
बैठकीत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात योजनेची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून पुढील दोन ते अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्जाबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील जुन्या पाणी वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण, नवीन जलवाहिन्या, जलसाठा व्यवस्था आणि सक्षम वितरण यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्यामुळे सोलापूरकरांना दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “सोलापूर शहराच्या भविष्यासाठी ही पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या सहकार्यामुळे योजनेला गती मिळत आहे. अंतिम टीपीआर २० जुलैपूर्वी शासनाकडे सादर करून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सोलापूरकरांना दीर्घकालीन व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.”