सोलापूर, : आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी भाविक सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी माळशिरस येथे सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन) व प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड १०८ एमएएमएस यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पार पडले.
पंचायत समिती, माळशिरस येथे आयोजित शिबिरात तालुक्यातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सीएचओ, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना सीपीआर आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले. यात्रेदरम्यान पाण्यात पडणे, बुडणे, फिट येणे, रक्तदाबातील चढ-उतार, रक्तातील साखरेचे असंतुलन किंवा दम्याचा झटका यांसारख्या प्रसंगांमध्ये तातडीने मदत कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात डॉ. अनिल काळे, डॉ. कौस्तुभ घाटूळे आणि युवराज वाघ यांनी सैद्धांतिक माहितीबरोबरच मॅनिकिनच्या साहाय्याने सीपीआरची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच ‘गुड समॅरिटन’ ॲपच्या वापराबाबतही माहिती देण्यात आली.
गेल्या चार वर्षांत सीपीआरच्या मदतीने ३० हून अधिक वारकरी भाविकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर उपस्थित होते. समारोपप्रसंगी त्यांनी सीपीआरचे महत्त्व अधोरेखित करत नियमित सराव व प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली.