सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित सोलापूर’ उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, त्याची सुरुवात आज सकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) वसतिगृह परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.




या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार ज्योती वाघमारे उपस्थित होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सहआयुक्त शशिकांत भोसले, डॉ. सचिन खरात, प्रख्यात चित्रकार व प्राचार्य मनोज बिडकर, हरित वसुंधरा फाउंडेशनचे प्रमुख अमित बनसोडे तसेच नगरसेवक प्रियदर्शन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असमतोल यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा प्रभावी उपाय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारून किमान काही झाडे लावून त्यांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचा संदेशही देण्यात आला.

यावेळी खासदार ज्योती वाघमारे यांनी हरित वसुंधरा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत संस्थेला ‘ग्रीन आर्मी’ अशी उपमा दिली. सोलापूरला हरित आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या स्वप्नासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमात सहभागी झालेल्या कर्मचारी, नागरिक आणि त्यांच्या पाल्यांनी प्रत्येकी पाच झाडे लावून पर्यावरण संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदविला.











