सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या रेशीम संचालनालय, नागपूर आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम कोष या नियंत्रित शेतीमालाच्या लिलावाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ रेशीम कोष बाजारपेठ, मौजे हिरज (ता. व जि. सोलापूर) येथे होणार आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे असणार आहेत. तर पुणे रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कोषाला योग्य बाजारभाव मिळावा, पारदर्शक लिलाव प्रक्रिया उपलब्ध व्हावी आणि रेशीम व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने हा लिलाव सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती, संचालक मंडळाचे सदस्य तसेच रेशीम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बाजार समितीचे सचिव अनुलसिंग रजपूत व रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी सर्व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला रेशीम कोष विक्रीसाठी आणून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे