No Result
View All Result
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांच्या तोडीस तोड नेण्यासाठी शिक्षण विभागाने ‘क्वालिटी मिशन’ हाती घेतले असून, प्रत्येक स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वेळापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, DIETचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील, शोभा मिसाळ, डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ. गजेंद्र जमादार, तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत Performance Grading Index for District (PGI-D) या राष्ट्रीय निर्देशांकाच्या आधारे सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक कामगिरीचा सखोल आढावा घेण्यात आला. इतर आघाडीच्या जिल्ह्यांशी तुलना करून उणिवा, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि आगामी कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने सुधारणा घडवण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, विद्यार्थी उपस्थिती, शाळा सुरक्षा, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा कृती आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि DIETचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ यांनी UDISE+, PARAKH आणि PRABANDH या प्रणालींतील माहिती वेळेत व अचूक भरणे, डेटा पडताळणी, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वंकष मूल्यमापन, ICT साधनांचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीत पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD) प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, शाळा सुरक्षा आणि समुदाय सहभाग या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठका घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या सर्व शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना दर्जेदार, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
No Result
View All Result