सोलापूर ; भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल करत, “राजकारणातील आसराणी म्हणजे संजय राऊत” अशी उपमा देत त्यांच्यावर जहरी टीका केली. राऊत यांच्या वक्तव्यांमुळेच शिवसेनेतून आमदार आणि खासदार बाहेर पडत असल्याचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा, असा सल्ला दिला.
कोठे म्हणाले, “शोले चित्रपटातील आसराणी जसा जेलर होता, तशीच भूमिका आज महाविकास आघाडीत संजय राऊत निभावत आहेत. ते स्वतः कधीही लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नाहीत, मात्र इतरांना सल्ले देण्यात कायम पुढे असतात.” ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी, गोरे यांनी विकासकामांसह संघटन मजबूत करत सलग चार वेळा जनतेचा विश्वास संपादन केला असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करत कोठे म्हणाले की, संजय राऊत यांच्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांना वेळेत आवर घालणे आवश्यक आहे. “राऊत यांच्या नेतृत्वाखाली सामना वृत्तपत्रही बंद पडेल,” असा टोला लगावत त्यांनी अभिजीत दिपके यांच्या नावाचाही उपरोधिक उल्लेख केला.
दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कोठे यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. सोलापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगत, त्यानंतर सोलापूर-गोवा, सोलापूर-नवी मुंबई आणि सोलापूर-तिरुपती या मार्गांवरील विमानसेवाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सेवांमुळे सोलापूरचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक सक्षम होणार असून उद्योग, पर्यटन आणि व्यापारालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.