No Result
View All Result
सोलापूर, ता. ९ : तक्रारदाराचे कोणतेही शासकीय काम प्रलंबित नव्हते. लाच पडताळणीच्या वेळी लाच मागणी झाली नसल्याचे आणि तक्रारदाराकडून वारंवार खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे कागदपत्रांच्या आधारे निदर्शनास आणून देत ॲड. नीलेश जोशी यांनी युक्तिवाद केला. त्यावर कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्या.वृषाली जोशी यांनी जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करून भूमिअभिलेख विभागातील अमोल भोसले व दऱ्याप्पा कुंभार यांना दोषमुक्त केले. वळसंग येथील शेतजमिनीचा काही भाग सोलापूर-अक्कलकोट रस्त्यासाठी संपादित करण्यात आला होता.
मात्र, अधिक जमीन संपादित झाल्याची शंका आल्याने जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. मोजणीचा अहवाल मिळावा, अशीही मागणी होती. यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अमोल भोसले, शिस्तेदार ज्योतीपाल कुचेकर व भूमापक दऱ्याप्पा कुंभार यांनी एक लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानुसार संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
लाच स्वीकारताना दऱ्याप्पा कुंभार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात अमोल भोसले व दऱ्याप्पा कुंभार यांच्यावतीने ॲड. नीलेश जोशी यांनी दोषमुक्तीसाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली.त्यांना दोषमुक्त केले. संशयितांतर्फे ॲड. नीलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. शक्ती कोळेकर व ॲड. स्मिता शिंदे यांनी काम पाहिले.
No Result
View All Result