सोलापूर : विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील महावीर चौक परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी (दोघे रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.५५ वाजता आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व मुलाला महावीर चौक परिसरातील ‘प्युमा’ शोरूममध्ये खरेदीसाठी घेऊन चालक सुरवसे आले होते. आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये असताना सुरवसे हे बाहेर थांबले होते.याचवेळी संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळी तेथे आला.
त्याने सुरवसे यांना पैशांचे आमिष दाखवत, “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढे काय करायचे ते मी बघतो,” असे सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.यानंतर आरोपी फुलारी यानेही सुरवसे यांना, “तुला साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझाच फायदा आहे,” असे सांगत आमदाराला जीवे मारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.आमदारांच्या चालकाला थेट पैशांचे आमिष दाखवून आमदारांच्या हत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयित आरोपींची भूमिका, या प्रकारामागील नेमका उद्देश आणि आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत ही हे करीत आहेत.