सोलापूर : पदमशाली समाजाचे आराध्यदैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला श्री मार्कंडेय मंदिरात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शंभर वर्षांहून अधिक काळाची रथोत्सव व मिरवणुकीची परंपरा जपत उत्सवमूर्तीच्या पालखीची मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढण्यात आली.उत्सवाच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल आणि त्यांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला.
त्यानंतर उत्सवमूर्तीच्या पालखीचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. पालखी प्रदक्षिणेदरम्यान भाविकांनी ‘जय मार्कंडेय’चा जयघोष केल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.पदमशाली समाजात नारळी पौर्णिमा उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. शतकभरापासून सुरू असलेली ही परंपरा आजही समाजबांधवांकडून श्रद्धा आणि उत्साहाने जपली जात आहे.
पालखी प्रदक्षिणेत महिला, युवक, समाजबांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळी पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाली येलदी, उद्योजक मुरलीधर आरकाल, गणेश बुधाराम, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष अॅड. हेमंतकुमार साका, नगरसेवक विजय चिप्पा, सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, तुषार जक्का यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
सात दिवस तेलुगू भाषेत ‘वचन’ कार्यक्रम: उत्सवानिमित्त श्री मार्कंडेय मंदिरात पुढील सात दिवस तेलुगू भाषेत ‘वचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा समाजबांधव आणि भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल आणि पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी केले.
२८ ऑगस्टला भव्य रथोत्सव: नारळी पौर्णिमेनिमित्त २८ ऑगस्ट रोजी श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा भव्य रथोत्सव व मिरवणूक काढण्यात येणार आहे. शतकभराची परंपरा असलेल्या या रथोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पदमशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.