सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीनिमित्त भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात भाजपच्या आगामी संघटनात्मक रणनीतीची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, मंडल अध्यक्ष नागेश खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र हा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय पट्टा मानला जातो. त्यामुळे विभागीय संघटनात्मक बैठकीत पक्षाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समन्वय तसेच आगामी काळातील पक्षविस्ताराच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर चर्चा होण्यास या बैठकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बूथ पातळीपासून पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच जनसंपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर राहण्याची शक्यता आहे.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे सोलापूरमधील भाजपच्या स्थानिक संघटनेलाही या बैठकीतून नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले.दरम्यान, सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळात विविध पातळ्यांवर नियोजन केले जाणार असल्याचे संकेत या बैठकीच्या निमित्ताने मिळत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार असल्याने आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.