सोलापूर : हातात सुई-धागा आणि डोळ्यांसमोर कल्पनेचे विश्व… या साध्या वाटणाऱ्या माध्यमातून जेव्हा कलाकृती जन्माला येते, तेव्हा प्रत्येक टाका एक कथा सांगू लागतो. पारंपरिक हस्तकलेचा समृद्ध वारसा जपत त्याला आधुनिक कलात्मकतेची जोड देणाऱ्या नेत्रतज्ज्ञ डॉ. उमा प्रधान यांच्या हातून साकारलेल्या आकर्षक हँड एम्ब्रॉयडरी कलाकृतींचे हे विशेष प्रदर्शन २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान सोलापुरात भरविण्यात येणार आहे या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी असणार आहे.
पु. ना. गाडगीळ यांच्या ‘Zapurza’ कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात भरतकामाच्या माध्यमातून साकारलेली मानवी चेहऱ्यांची पोर्ट्रेट्स, फुले, पक्षी, निसर्गदृश्ये आणि विविध कलात्मक रचना रसिकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही डॉ. प्रधान यांनी कलेची आवड जोपासत सुई-धाग्याच्या माध्यमातून स्वतंत्र कलाविश्व उभे केले आहे.
भारताच्या विविध भागांत भरतकामाच्या स्वतंत्र शैली विकसित झाल्या आहेत. उत्तर प्रदेशची चिकनकारी, पंजाबची फुलकारी, पश्चिम बंगाल व ओडिशातील कांथा वर्क, काश्मिरी कशिद यांसारख्या कलाप्रकारांनी भारतीय हस्तकलेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याच समृद्ध परंपरेची प्रेरणा घेत आधुनिक विषयांना भरतकामाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे.
धावपळीच्या युगात हरवत चाललेली कला ; मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या युगात सुई-धाग्याने कलाकृती साकारण्याची पारंपरिक पद्धत युवा पिढीपासून काहीशी दूर जात आहे. हीच कला नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, युवक-युवतींना या कलाप्रकाराची ओळख व्हावी आणि सोलापूरकर रसिकांना या हस्तकलेचा जवळून अनुभव घेता यावा, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, डॉक्टर म्हणून रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. उमा प्रधान यांच्या कलाकृतींमध्ये मात्र रंग, रेषा आणि धाग्यांतून सौंदर्य पाहण्याची त्यांची वेगळी दृष्टी अनुभवायला मिळणार आहे.कलाप्रेमी, विद्यार्थी, युवक-युवती आणि सोलापूरकर नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन धाग्यांतून साकारलेल्या या अनोख्या कलाविश्वाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धाग्याच्या प्रत्येक टाक्यात कलात्मकतेचा स्पर्श ; भरतकाम ही केवळ सजावटीची कला नसून त्यामागे प्रचंड संयम, बारकाई आणि कल्पकता आवश्यक असते. एका कलाकृतीसाठी असंख्य टाके, रंगांची अचूक निवड आणि प्रत्येक रेषेचा बारकाईने विचार करावा लागतो. डॉ. प्रधान यांच्या कलाकृतींमध्ये याच बारकाव्यांसोबत रंगसंगती आणि टाक्यांचे वैविध्य प्रकर्षाने जाणवते.
‘Zapurza’मधून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ : पु. ना. गाडगीळ यांचा ‘Zapurza’ हा कलाविषयक उपक्रम विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपली कला रसिकांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमाअंतर्गत डॉ. उमा प्रधान यांच्या भरतकाम कलाकृतींचे हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पारंपरिक कलेला प्रोत्साहन देतानाच कलाकार आणि रसिक यांच्यातील दुवा म्हणून ‘Zapurza’ची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.