ग्राहकाने विचारला जाब, दुकानदाराशी वाद
सोलापूर : सोलापूर शहरातील नवी पेठ परिसरातील दिवेकर बेकरीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सीलबंद पाणीपुरीच्या पाकिटात कीडा आणि आळी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्राहक अरविंदकुमार सोनवणे यांनी दिवेकर बेकरीमधून पाणीपुरीचे सीलबंद पाकीट खरेदी केले होते. घरी पाकीट उघडल्यानंतर त्यातील पाणीपुरीमध्ये कीडा तसेच आळी आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर सोनवणे यांनी या प्रकाराची छायाचित्रे काढून ठेवली. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी सोनवणे हे पुन्हा बेकरीमध्ये गेले. मात्र, दुकानदाराकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट उडवाउडवीची उत्तरे देत वाद घालण्यात आल्याचेही ग्राहकाचे म्हणणे आहे.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हसीलबंद खाद्यपदार्थामध्ये कीडा आणि आळी आढळल्याचा आरोप गंभीर असून, संबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री प्रक्रियेची तपासणी होणे गरजेचे आहे. या प्रकाराची संबंधित अन्न सुरक्षा विभागाने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संबंधित प्रशासन या प्रकाराची काय दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











