खाकीचा दणका बसताच तीन गुन्ह्यांची कबुली; चोरीच्या चार दुचाकी हस्तगत
सोलापूर : मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या काही काळापासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या सराईत आरोपीच्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, चौकशीत त्याने करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी व दरोड्याच्या तीन गंभीर गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
भैय्या लाला काळे (वय २३, रा. पोमलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यासह (मोक्का) दरोडा व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत होते. दरम्यान, काळे हा पोमलवाडी गावात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी व दरोड्याच्या तीन गंभीर गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकलीही हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रवी माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, सलीम बागवान, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, विनायक घोरपडे, अन्वर अत्तार, राजेंद्र गवेकर, अश्विनी गोटे व पल्लवी इंगळे यांच्या पथकाने केली.