शहरभर तपासणी-जागृती शिबिरांचे नियोजन; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा पुढाकार
सोलापूर : शहरातील महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता वाढविण्यासह आजाराचे वेळीच निदान व्हावे, यासाठी महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत महिलांसाठी कॅन्सर निदान व जनजागृती शिबिरे घेण्याचे नियोजन असून, त्यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीच्या डॉक्टर आणि प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. उपमहापौर देवकर यांनी इंडियन कॅन्सर सोसायटी तसेच ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. सरिता कोठाडिया यांच्यासह प्रतिनिधींशी या उपक्रमाबाबत चर्चा केली. शहरातील कोणत्या भागांत शिबिरांची अधिक आवश्यकता आहे, शिबिरांचे स्वरूप कसे असावे आणि तपासणीची सुविधा अधिकाधिक महिलांपर्यंत कशी पोहोचविता येईल, याबाबत सविस्तर नियोजन केले जाणार आहे.
शहरात कष्टकरी महिलांची संख्या मोठी आहे. घर, कुटुंब आणि रोजगाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकदा महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. नियमित आरोग्य तपासणीचा अभाव, शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष तसेच लक्षणे जाणवल्यानंतरही वैद्यकीय सल्ला घेण्यास होणारा विलंब चिंतेचा विषय आहे. त्यामुळे महिलांना नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असल्याचे देवकर यांनी सांगितले. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून शिबिरांमध्ये कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व आणि लवकर निदानाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः स्तनाच्या कर्करोगासह महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत असलेले गैरसमज दूर करून त्यांना आरोग्याविषयी सजग करण्यावर भर दिला जाणार आहे.
महापालिका आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या समन्वयातून या उपक्रमाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. कष्टकरी तसेच सर्वसामान्य महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती, मार्गदर्शन आणि तपासणीची सुविधा पोहोचवून ‘कॅन्सरमुक्त सोलापूर’च्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले.
‘भीती नको, वेळीच तपासणी करा’ “कॅन्सरबाबत भीती बाळगण्याऐवजी जागरूक राहणे अधिक महत्त्वाचे आहे. आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. त्यामुळे शहरातील सर्व स्तरांतील महिलांपर्यंत कॅन्सरविषयक जनजागृती आणि तपासणीची सुविधा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.” — ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर