No Result
View All Result
सोलापूर : शहरातील नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित कामांसाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभागाच्या रेल डाक सेवा (आरएमएस) ‘बी’ विभागाच्या कार्यालयात आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांच्या हस्ते करण्यात आले.
रेल्वे स्थानकाच्या व्हीआयपी गेटजवळील रेल डाक सेवा ‘बी’ विभागाच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात आधारची नवीन नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक तसेच इतर आवश्यक तपशीलांमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे केंद्र दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. यावेळी प्रवर डाक अधीक्षक एच. ई. खडकेकर, एसपी (मुख्यालय) पी. ए. वंगाळे, वरिष्ठ डाकपाल एस. पी. काळे, आरपीएफ निरीक्षक मारुती घोळवे यांच्यासह डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रेल डाक सेवा ‘बी’ विभागाचे अधीक्षक एरंडे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडुरकर आणि रेल डाक निरीक्षक सी. एम. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नियोजन एन. एन. कुलकर्णी व प्रताप आंबेवाले यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल निंबाळकर यांनी केले. या केंद्रामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीची कामे जलद व सुलभ होणार असून, नागरिकांचा वेळ आणि गैरसोय दोन्ही वाचणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
No Result
View All Result