सोलापूर, ; एका सहशिक्षकाची फंडाची रक्कम काढून देण्याच्या कामासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक व ग्रंथपालाला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार असलेल्या वरिष्ठ लिपिकाचा अॅन्टी करप्शन ब्यूरोकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५, सध्या रा. मंगल रेसिडेन्सी, होटगी रोड, सोलापूर, मूळ रा. वायगाव, ता. अहमदपूर), वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी (वय ४८, रा. कडलास, ता. सांगोला) तसेच श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण (ता. करमाळा) येथील ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. तर लिपिक मेटकरी हा फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदाराची फंडाची रक्कम काढून देण्यासाठी आरोपींनी सहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.
तिघांच्या घराची घेतली झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अधीक्षक बालवाड याच्या सोलापुरातील भाड्याच्या घराची व लातूर येथील घराची झडती घेतली. बारबोले याच्या कुडूवाडीतील घराची तर मेटकरी याच्या सांगोल्यातील घराची झडती घेण्यात आली, परंतु घरझडतीत काही सापडले नसल्याचे सांगण्यात आले.