सोलापूर : एका गर्भवती महिलेच्या उपचाराबाबत आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी डफरीन हॉस्पिटलला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित महिलेला तातडीने योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.पाहणीदरम्यान हॉस्पिटलमधील विविध विभागांची माहिती घेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला.

महिलांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. तसेच गंभीर अवस्थेतील महिलेला पुढील उपचारासाठी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली.यावेळी हॉस्पिटलमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडेही उपमहापौरांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाण्याची टाकी स्वच्छ करण्याच्या आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.“रुग्णसेवेत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.











