नेतृत्वाची पावती! डॉ. ऋत्विक जयकरांची MASIच्या कार्यकारी समितीवर बिनविरोध निवड
सोलापूर : महाराष्ट्र राज्य शाखा असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (MASI)च्या सन २०२७ ते २०३० या कार्यकाळासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत पुणे विभागातून कार्यकारी समिती सदस्य म्हणून मा. अधिष्ठाता डॉ. ऋत्विक अरुंधती देवीदास जयकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. जयकर हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा तसेच प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची MASIच्या कार्यकारी समितीवर बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या वतीने डॉ. जयकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

MASIच्या माध्यमातून राज्यातील शल्यचिकित्सकांमध्ये समन्वय वाढविणे, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व ज्ञानाची देवाणघेवाण करणे तसेच शल्यचिकित्सा क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या कार्यकारी समितीवर डॉ. जयकर यांची निवड होणे ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे.यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, कार्यालयीन अधीक्षक एन. टी. देशमुख, बसवराज औरसग यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. जयकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.











