सोलापूर : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारपासून (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. या संदर्भातील निवडणूक अधिसूचनाही उद्याच प्रसिद्ध होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी १ जून ही अंतिम तारीख असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १९ स्थानिक स्वराज्य संस्थेतील ६१६ मतदार आहेत. उमेदवारी अर्जासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. निवडणूक लढण्यासाठी खुल्या गटातील उमेदवारांना १० हजार तर अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागणार आहे.
मतदानासाठी उपविभागीय स्तरावर सहा मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २ जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जूनपर्यंतची मुदत आहे. या निवडणुकीसाठी १८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.