सोलापूर : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे.राजेंद्र राऊत यांच्या नावाची संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चा सुरू झाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे.
विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात अनुभवी नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना काही समर्थकांकडून व्यक्त केली जात असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे, राऊत यांच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात पक्षीय पातळीवर कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीला “राजकीय सरप्राईज” म्हणूनही पाहिले जात असून, पुढील काही दिवसांत या चर्चांना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी उत्तम जानकर यांच्या मुलाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढली आहे. विविध इच्छुकांकडून अर्ज प्रक्रिया सुरू असून अंतिम उमेदवारी आणि पक्षीय निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.