सोलापूर : सोलापूर शहरातील दिवस व रात्री घरफोडी करून सोन्याचे दागिने व लॅपटॉप चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत नगर व जुना विडी घरकुल परिसरात मार्च २०२६ मध्ये घरफोडीच्या दोन घटना घडल्या होत्या. घरातील कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि लॅपटॉपची चोरी केली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शहर गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी करणारा संशयित आरोपी चोरीचे सोने विक्री करण्यासाठी शहरात येणार आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दीपक वेंकट श्रीगण (वय २३, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ९६ हजार रुपये) तसेच एमएसआय कंपनीचा लॅपटॉप (किंमत २३ हजार रुपये) असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरासह इतर जिल्ह्यांमध्येही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केली.