सोलपूर ; सर्वसाधारण चार सदस्य असलेल्या कुटुंबाला महिन्याला अडीच हजार रुपयांचा किराणा लागतो. मागील महिन्यात ज्यांनी महिनाभराच्या किराणासाठी अडीच हजार रुपये मोजले, त्यांना या महिन्यात साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. दैनंदिन लागणाऱ्या वस्तूही महागाईच्या कचाट्यात सापडल्याने किराणा बजेटमध्ये सरासरी ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. याबाबत गृहिणींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
पावसामुळे विस्कळित झालेला खरीप हंगाम, अपुरे पीक क्षेत्र, आयात व निर्यातीचे धोरण यामुळे महागाईचा फटका कुटुंबांना बसत आहे. मागील महिन्यात धान्य, डाळी, खाद्यतेल व साखर-गुळाच्या भावातील वाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मिठाईची बाजारपेठदेखील हादरण्याची चिन्हे आहेत. आधी तांदूळ आणि नंतर साखरेने दणका दिला. साखरेचे भाव ७५ रुपये प्रतिकिलोवर गेल्यानंतर आता पुन्हा ६६ रुपयांवर आले आहेत. दर कमी झाले नाहीत तर मिठाई बाजारातील दर भडकण्याची चिन्हे आहेत. साखरेच्या महागाईचा ताण गुळावर आला आहे. श्रावणापासून दिवाळीपर्यंत सर्व सणांत गोडाधोडाच्या पदार्थांचे अर्थकारण ताणले जाणार आहे. खाद्यतेलाचे भाव वाढणार दरम्यान, पामतेलामुळे बाजारातील खाद्यतेलाच्या दराचे संतुलन टिकून असते.
मात्र, शेंगदाणा तेलाचे भाव सध्या २०० रुपयांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. येत्या हंगामात शेंगदाण्याची आवक गुजरातमधून चांगली झाल्यास शेंगदाणा तेलाचे भाव वाढू शकतात. उपवासाच्या पदार्थांना फटका श्रावण महिन्यासह अश्विन नवरात्रापर्यंत उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. त्यातच वरई म्हणजेच भगरीचे भाव आधीच दुप्पट झाले आहेत. हे दर नवीन पीक हाती येईपर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता नाही. साबुदाण्याचे भावदेखील वधारले आहेत.
केवळ डाळीचे भवितव्य संकटात दरम्यान, डाळीच्या बाजारात मुगाचे पीक पावसाच्या विस्कळितपणामुळे कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुगडाळीचे भाव वाढतील, असे मानले जाते. उडदाचे क्षेत्र कमी झाल्याने भाव वाढले आहेत. उत्पादकांना त्याचा फायदा होईल. मात्र, ग्राहकांना उडीद डाळ महाग पडणार आहे. तुरीच्या बाबतीत परतीचा पाऊस खूप महत्त्वाचा असेल. तरीही विजापूर व कलबुर्गी भागात वाढलेल्या सिंचनामुळे आलेले तुरीचे पीक हाती येईल. मात्र, आयात तुरीमुळे उत्पादकांना फटका बसणार आहे.
बाजारात किराणा मालाच्या दरांत चढ-उतार काही प्रमाणात सुरू आहेत. पुढील पिके हाती येण्यावर बाजाराची स्थिती बदलू शकते. तोपर्यंत काही वस्तू स्वस्त, तर काही महाग असतील. –भाग्यश्री किराणा व्यापारी, सैफुल सोलापूर