सोलापूर : सोलापूर शहरातील झोपडपट्टी आणि हद्दवाढ भागांमध्ये घरांवरून गेलेल्या धोकादायक वीजतारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी या कामासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.कोठे म्हणाले, शहरातील अनेक झोपडपट्ट्या आणि हद्दवाढ भागांमध्ये वीजतारा घरांच्या अगदी जवळून किंवा छतांवरून जात आहेत. या तारांच्या संपर्कात आल्याने अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. तसेच देव-देवतांच्या जयंती, महापुरुषांच्या मिरवणुका आणि विविध उत्सवांच्या वेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद करावा लागतो. त्यामुळे या वीजतारा स्थलांतरित करण्यासाठी १० ते २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि घरांवरील धोकादायक तारांना प्राधान्याने हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.


यावेळी त्यांनी सोलापूर येथील प्राणी संग्रहालयाचाही मुद्दा उपस्थित केला. चार जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी महापालिकेने २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून आतापर्यंत ७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित १५ कोटी रुपयांचा निधी लवकर मंजूर झाल्यास प्राणी संग्रहालयाचे काम गतीने पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज तलाव विकासासाठी ४० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असल्याचे नमूद करत त्यांनी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेतून मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणीही केली. दरम्यान, समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी १,३७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल तसेच उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करणारा ठराव आमदार कोठे यांनी मांडला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी या अभिनंदन प्रस्तावात आमदार देवेंद्र कोठे यांच्याही योगदानाचा उल्लेख करण्याची सूचना केली.












