अक्कलकोट, (वा.) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील उद्योग, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी स्वामींचा आशीर्वाद लाभावा, यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा भाजपचे नगरसेवक महेश इंगळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार केला. उदय सामंत म्हणाले, अक्कलकोट ही केवळ धार्मिक नगरी नसून येथील भक्ती आणि श्रद्धेची शक्ती संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देते. राज्याच्या औद्योगिक विकासासाठीही ही सकारात्मक ऊर्जा निश्चितच उपयुक्त ठरेल. उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, या कार्यासाठी स्वामींचे आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना आपण केली आहे. यावेळी खा. ज्योतीताई वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेना नेते मनीष काळजे, संतोष पाटील, प्रविण तानवडे, विनोद मोरे, रविना राठोड, महेश साठे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, रमेश शिंदे उपस्थित होते.