सोलापूर : शहर प्रतिनिधीमहापालिका सफाई कामगारांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अन्यथा २० मेपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा महापालिका कामगार संघटना कृती समितीने प्रशासनाला दिला आहे. वेतन रखडल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देण्यात आले. एप्रिल पेड इन मे २०२६ चा मासिक पगार अद्याप मिळालेला नसल्याची गंभीर बाब या निवेदनातून मांडण्यात आली. महिना संपत आला तरी वेतन न झाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.अनेक सफाई कामगारांचे संपूर्ण कुटुंब मासिक वेतनावर अवलंबून असून दर महिन्याला पगार उशिरा होत असल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत.

घरखर्च, मुलांचे शिक्षण, बँकांचे हप्ते तसेच दैनंदिन गरजा भागवताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.कामात उशीर झाल्यास कामगारांवर ३००, ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत न देणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा थेट सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.याशिवाय सफाई कामगारांसाठी वारंवार काढण्यात येणाऱ्या परिपत्रकांमुळे कामकाजात गोंधळ निर्माण होत असून रजा प्रकरणे प्रलंबित राहून आर्थिक नुकसान होत असल्याचाही आरोप करण्यात आला. निवेदनावेळी शेषराव सिरसट, अनिल जगझाप, सहदेव सोनवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


सफाई कामगारांना वेठबिगारी समजू नका; त्यांना वेळेवर वेतन द्या, मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास २० मे रोजी महापालिकेत तीव्र आंदोलन आणि कामबंदचा मार्ग अवलंबला जाईल.-;
अशोक जानराव, अध्यक्ष- महापालिका कामगार संघटना कृती समिती.










