ईएसजी विभागात राष्ट्रीय स्तरावर प्रथम उपविजेतेपद; सलग तिसऱ्या वर्षी प्रतिष्ठेच्या पुरस्काराची हॅट्रिक

सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड (पीसीएल)ने औद्योगिक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर ‘ईटी नाऊ मशीनीस्ट सुपर शॉपफ्लोअर अवॉर्ड-२०२६’ पटकावला आहे. Environmental, Social and Governance (ESG) विभागातील मध्यम उद्योग गटात (Medium Enterprise Segment) कंपनीला ‘प्रथम उपविजेते’ (1st Runner-Up)हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

ऑटोमोबाईल उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यासाठी द टाइम्स ग्रुप, वर्ल्डवाइड मीडिया आणि ईटी नाऊ** यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. तांत्रिक गुणवत्ता, व्यवस्थापन प्रणाली आणि कार्यपद्धतीच्या विविध निकषांवर झालेल्या कठोर मूल्यमापनानंतर प्रिसिजन कॅमशाफ्ट्सची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, २०२४, २०२५ आणि २०२६ या सलग तीन वर्षांत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवून कंपनीने हॅट्रिक साधली आहे. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा, पर्यावरणीय जबाबदारी आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील कंपनीचे सातत्यपूर्ण योगदान पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.


पुणे येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कंपनीचे सुहास पाटील (वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक), अमित पाटील (वरिष्ठ अधिकारी–सुरक्षा) आणि ऋषिकेश शिंदे (पर्यावरण अधिकारी) यांनी कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचे पालन, प्रभावी ईएसजी व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सुधारणा याबद्दल कंपनीचा गौरव करण्यात आला.











