सोलापूर : श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे माढा तालुक्यात आगमन होताच मुंगशी येथे महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने पालखीचे भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी पालखीचे पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि वारकरी संप्रदायाला शुभेच्छा दिल्या.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त तैनात केला असून वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच महसूल विभागाच्या समन्वयातून वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रशासनाच्या या स्वागत उपक्रमामुळे वारकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, माढा तालुक्यातील पालखी सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पुढील मार्गक्रमण करत आहे.