सोलापूर, . आगामी पूजा, दसरा आणि दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने देशभरात तब्बल ४१८ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सोलापूर विभागाशी संबंधित विविध मार्गांवरील विशेष गाड्यांचाही समावेश असून, सणासुदीत गावी जाणाऱ्या तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी-चेन्नई बीच-सीएसएमटी साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी क्रमांक ०१०१५ बुधवारी रात्री १२.३५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक ०१०१६ गुरुवारी पहाटे ४ वाजता चेन्नईहून रवाना होईल. या विशेष गाडीच्या एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
सीएसएमटी-बंगळुरू-सीएसएमटी साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी क्रमांक ०१०१३ शनिवारी रात्री १२.३५ वाजता सीएसएमटीहून सुटणार आहे. गाडी क्रमांक ०१०१४ रविवारी पहाटे ४.३० वाजता बंगळुरूहून रवाना होईल. या मार्गावर एकूण १४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सीएसएमटी-लातूर-सीएसएमटी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०११०५ मंगळवार आणि गुरुवारी रात्री १२.३५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक ०११०६ मंगळवार आणि गुरुवारी दुपारी ४.३० वाजता लातूरहून रवाना होणार असून, या गाडीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.
कोल्हापूर-कलबुरगीच्या ६४ फेऱ्या
कोल्हापूर-कलबुरगी-कोल्हापूर विशेष गाडी क्रमांक ०१४५१ शुक्रवार वगळता दररोज सकाळी ६.१० वाजता कोल्हापूरहून सुटेल. तर गाडी क्रमांक ०१४५२ कलबुरगीहून सायंकाळी ६.१० वाजता रवाना होईल. या विशेष गाडीच्या सर्वाधिक ६४ फेऱ्या होणार आहेत.
सोलापूर, कुर्डूवाडीला थांबा
विशेष गाड्यांना कुर्डूवाडी, सोलापूर आणि कलबुरगी येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही सणासुदीच्या काळात या विशेष रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण २७ व २८ सप्टेंबर २०२६ पासून आयआरसीटीसी तसेच रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर सुरू होणार आहे.










