
सोलापूर.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मांडव, फर्निचर आणि इतर साहित्य पुरवठ्यापोटी सादर करण्यात आलेली तब्बल ६ कोटी ७० लाख रुपयांची बिले आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या संपूर्ण आर्थिक व्यवहारावर संशयाची सुई निर्माण झाल्याने, स्थायी समितीने हे बिल रोखून धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने १ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचे कंत्राट दिले होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित कंत्राटदाराने तब्बल ६ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचे बिल सादर केल्याने खळबळ उडाली. या वाढीव बिलाबाबत आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी हरकत नोंदवून तातडीने चौकशी समिती नेमली होती.

चौकशी समितीने तपासणीअंती हे बिल ३ कोटी ५८ लाख ३० हजार २७१ रुपये इतके निश्चित केले. प्रशासनाने सुधारित बिलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र, मंगळवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत, सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत या बिलावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत, समितीने प्रस्ताव फेटाळून तो प्रशासनाकडे फेरसादर करण्याचे आदेश दिले आहेत. या सभेच्या अजेंड्यावर एकूण १२ विषय होते, त्यापैकी १० विषयांना मंजुरी देण्यात आली.











