No Result
View All Result
चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांसह रोकड चोरी; साथीदारासह गुन्हा दाखल
सोलापूर : शहरातील वसंत विहार परिसरात घरातील मुलीनेच आईच्या संमतीशिवाय सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांसह रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज नेल्याप्रकरणी मुलगी आणि तिच्या साथीदाराविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहिनी महेश भिंगारे (वय ४३, रा. वसंत विहार, सोलापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडील माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या घरात त्यांच्या सासूने दिलेल्या चार तोळ्यांच्या वडिलोपार्जित सोन्याच्या बांगड्या तसेच रोख रक्कम ठेवण्यात आली होती.
फिर्यादींची मुलगी श्रुती भिंगारे हिने आईची संमती न घेता घरातील सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या कृत्यास विशाल सुनील टोणपे (रा. हनुमान नगर, सोलापूर) याने प्रोत्साहन दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रुती भिंगारे आणि विशाल टोणपे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस बावणे करीत आहेत.
No Result
View All Result