२३ ऑक्टोबरला विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान; सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे आदेश.
सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे आदेश जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
त्यामुळे मतदानाच्या दिवशी संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक सवलत मिळणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संलग्न सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या आणि संबंधित मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंद असलेल्या पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू राहणार आहे.या संदर्भात जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी २२ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहे.
पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच मंजूर रजेची नोंद संबंधित शाळेच्या अभिलेखात नियमानुसार घेण्यात यावी. या आदेशांची आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने पात्र मतदारांना मतदान करता येणार आहे.