सोलापूर : कर्जबाजारीपणामुळे पैशांची गरज निर्माण झाली अन् चोरी करण्याचा निर्णय घेतलेल्या एका तरुणाने युट्युबवर कुलूप उघडण्याची पद्धत पाहून जामगाव (ता. माढा) येथे घरफोडीचा डाव आखला. मात्र, चोरी करताना घरमालक जागा झाल्याने त्याने त्यांच्यावर हातोड्याने हल्ला करून त्यांची हत्या केली आणि घरातील सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. या खळबळजनक खून व घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत आरोपीला कलबुर्गी, कर्नाटक येथून जेरबंद केले. अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, हल्ली रा. लऊळ, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
झोपेतून जागे झाले अन्… २५ ऑगस्टच्या रात्री ९ ते २६ ऑगस्टच्या सकाळी साडेअकराच्या दरम्यान जामगाव येथे ही घटना घडली. विजयकुमार अशोक मुळे यांच्या घरात चोरट्याने मागील बाजूने प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून दागिने लंपास करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) जागे झाले. अशोक मुळे यांनी चोरट्याला ओळखल्याने आरोपीने जवळील हातोड्याने त्यांच्या डोक्यात जबर प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने सोन्याचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला.
युट्युब व्हिडिओ ठरला चोरीचा ‘गुरू’ पोलिसांच्या तपासात आरोपीने धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले. घराच्या पाठीमागील पाईपच्या साहाय्याने तो घरात शिरला. वरच्या खोलीचे लोखंडी कुलूप उघडण्यासाठी त्याने युट्युबवर पाहिलेल्या पद्धतीचा वापर केला. सिरिंजच्या माध्यमातून कुलपात पेट्रोल टाकून ते पेटवून कुलूप उघडल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. यानंतर कपाट उचकटत असताना अशोक मुळे जागे झाले आणि चोरीचा डाव रक्तरंजित हत्येत बदलला.
सीसीटीव्हीने दिली दिशा; कलबुर्गीत सापळा गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चार स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. सपोनि विजय शिंदे यांच्या पथकाने तब्बल तीन दिवस जामगावात तळ ठोकून घटनास्थळाचा बारकाईने तपास केला. घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांसह गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीतून आरोपीचा सुगावा लागला. दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याची चाहूल लागताच आरोपीने मोबाईल बंद करून पलायन केले. सीसीटीव्हीच्या आधारे तो कलबुर्गी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कलबुर्गीकडे रवाना झाले.
वाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असल्याची माहिती मिळताच वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला माढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याबाबत तसेच चोरीच्या दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू आहे. पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहित शिंदे करीत आहेत. या कारवाईमुळे खून आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.