सोलापूर : राज्यातील शिक्षकांना गंभीर आजार अथवा शस्त्रक्रियेच्या वेळी उपचारांच्या मोठ्या खर्चाची चिंता भेडसावू नये, यासाठी पोलिसांप्रमाणेच कॅशलेस आरोग्य उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मंगेश नरसिंह चिवटे यांनी सातत्याने लावून धरलेल्या या मागणीच्या अनुषंगाने शिक्षकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्याचे चिवटे यांच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्ष योजना कार्यान्वित झाल्यास राज्यातील शिक्षकांना आरोग्य उपचारांच्या खर्चापासून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
शिक्षकांना पोलिस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर शासनामार्फत कॅशलेस उपचार मिळावेत, अशी मागणी चिवटे यांनी केली होती. शिक्षकांना गंभीर आजार, अपघात किंवा मोठ्या शस्त्रक्रियेच्या प्रसंगी उपचारासाठी मोठी रक्कम उभी करावी लागते. त्यामुळे उपचारासाठी आधी पैसे भरण्याची वेळ येऊ नये आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये थेट कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. याच मागणीसंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात बैठकही झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात शिक्षकांच्या कॅशलेस आरोग्य उपचारासंदर्भात समिती स्थापन करून पुढील कार्यवाही करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे
दरम्यान, नेर्ले येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आरटीओ अनिल पाटील आणि आयपीएस अधिकारी अंकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनिल पाटील यांनी शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कॅशलेस उपचाराच्या मागणीबाबत त्यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रयत्नांचे स्वागत करत चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांना स्वतःच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने प्रस्तावित कॅशलेस सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. समितीच्या माध्यमातून योजनेचे स्वरूप, पात्र शिक्षक, समाविष्ट आजार व उपचार, रुग्णालयांचे जाळे आणि अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित होण्याकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षकांना नेमका काय फायदा होणार? कॅशलेस आरोग्य उपचार योजना प्रत्यक्षात लागू झाल्यास पात्र शिक्षकांना मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचार घेताना मोठी रक्कम तत्काळ खिशातून भरावी लागण्याचा ताण कमी होऊ शकतो. गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा शिक्षक कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेचे कवच ठरू शकते. मात्र, योजनेची अंतिम व्याप्ती आणि अटी शासनाच्या पुढील निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहेत.