No Result
View All Result
सोलापूर; . शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी महापालिकेने आखलेल्या सुमारे १ हजार ४३८ कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे बंगळुरूला जाणार आहेत. तेथील तज्ज्ञ संस्थांना भेट देऊन सोलापूरच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक बाबी, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाचा अभ्यास केला जाणार आहे.
सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांचे नियोजन केले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त ओंबासे बंगळुरूतील संबंधित संस्थांशी चर्चा करणार आहेत. देशातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा क्षेत्रात वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान, पाणीगळती रोखण्याच्या पद्धती, पाण्याचे नियोजन, वितरण व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित तांत्रिक उपाययोजनांची माहिती या दौऱ्यात घेतली जाणार आहे. सोलापूरच्या भौगोलिक आणि पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीनुसार त्यातील कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात, याचीही चाचपणी केली जाणार आहे.
फेरआराखड्यापूर्वी तांत्रिक पडताळणी
पाणीपुरवठा योजनेचा फेरआराखडा अंतिम करण्यापूर्वी त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून भविष्यातील गरजांचा समावेश करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. बंगळुरू दौऱ्यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग सुधारित आराखडा अधिक परिणामकारक करण्यासाठी होण्याची अपेक्षा आहे.
No Result
View All Result