सोलापूर : शहरातील दत्त चौक परिसरात दुकानदाराकडील पिशवीतील सुमारे एक लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेत मोटारसायकल चोरून नेल्याच्या प्रकरणाचा शहर गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावला. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीच्या रोकड रकमेसह मोटारसायकल असा एकूण सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीत जबरी चोरी, मोटारसायकल चोरी व इतर चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी सोलापूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाऊंडजवळील मार्केट चौकी ते हरिभाई प्रशालेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या MH-13-DF-5334 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या थांबलेले आढळून आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे व त्यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे मल्लिनाथ राजशेखर जवकळी (वय ३६, व्यवसाय ड्रायव्हर, रा. उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय १८) अशी समोर आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनी दत्त चौक परिसरातील एका सराफा दुकानदाराकडून पायी चालत जात असताना पाठीमागून धक्का देऊन त्यांच्याकडील पिशवी हिसकावल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. या पिशवीत ₹१ लाखांची रोकड होती. त्यानंतर चोरलेली रोकड घेऊन मोटारसायकलवरून पसार झाल्याचे समोर आले.
तसेच आरोपींच्या ताब्यातून पिशवीमधील चोरीची ₹१ लाखांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली ₹१ लाख किंमतीची MH-13-DF-5334 क्रमांकाची युनिकॉर्न मोटारसायकल, असा एकूण ₹२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 708/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे व त्यांच्या पथकातील वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी यांनी केली.