सोलापूर : महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकृत शिक्के चोरीला गेल्याच्या प्रकरणाने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासून चार दिवसांत दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सभागृहात लक्षवेधी मांडून प्रशासनाचा जाब विचारला जाईल, असा इशारा समितीच्या सभापती श्रद्धा पवार यांनी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
महापालिकेच्या कार्यालयातून शिक्के चोरीला गेल्याची घटना १० जून २०२६ रोजी घडली. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास आणि दोषींवर कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
महापालिका कार्यालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय ठिकाणी चोरीची घटना घडूनही त्याचा तपास पुढे सरकत नसल्याबद्दल निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरी करणाऱ्या व्यक्तींचा माग काढणे शक्य होऊ शकते. त्यामुळे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तातडीने तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास महापालिका सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच महापालिकेतील शासकीय रेकॉर्ड, साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे.