सोलापूर : हडपसर ते घोरपडीदरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या कामामुळे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत होणार आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बससेवेची तयारी केली आहे. सोलापूर विभागातून गरजेनुसार सात अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी विभागाने आगाऊ नियोजन केले आहे. रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. या संदर्भात एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी माहिती दिली. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी एसटीची अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द; एसटीचा पर्याय सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, मेगा ब्लॉकमुळे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी विभागाकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन गरजेनुसार आणखी बस उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. तसेच स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी आणि मागणी यानुसार बससेवेचे नियोजन करण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.रेल्वेसेवा पूर्ववत होईपर्यंत एसटी सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार असून, प्रवाशांनी उपलब्ध बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.